संस्थेची ध्येये आणि उद्दिष्टे
संस्थेची ध्येये आणि उद्दिष्टे
१. मूळच्या कोंकण प्रदेशातील असलेल्या गाबीत, दर्यावर्ती-आरमारी मराठा, क्षत्रिय आरमारी मराठा, खारवी, कारवारी, गाबता, पडवी अश्या विविध नावांनी ओळखले जात असलेल्या सर्व व्यक्तींना एकत्र करणे आणि त्यांच्या उत्कर्षाचा प्रयत्न करणे.
२. समाजातील बंधु-भगिनींमध्ये एकता, बंधुत्व व राष्ट्रप्रेम निर्माण करणे. शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांच्या आड येणार्या समाज विघातक अनिष्ठ रूढी व चालीरीती यांना आळा घालून समाजात एकोपा व सहकार्य यांचे वातावरण निर्माण करणे व त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधणे.
३. समाजात सर्व प्रकारच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार करून समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती करण्यात हातभार लावणे. समाज बांधवांस त्यांचे शिक्षण, कर्तृत्व, कला व गुण यांस अनुरूप अशी योग्य संधी निरनिराळ्या क्षेत्रात मिळेल, यासाठी मार्गदर्शन करणे व उत्तेजन देणे.
४. समाज बांधव व शासन यांच्यासमोर समाजाच्या शैक्षणीक, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे चित्र स्पष्ट व्हावे यासाठी समाजाची जरूर ती माहिती गोळा करणे. गोळा केलेल्या माहितीचे वर्गीकरण, पृथ्थकरण करणे तथा त्या माहिती बाबतचे निष्कर्ष काढणे, जरूरी भासल्यास अशा प्रकारे गोळा केलेली माहिती शासनासमक्ष सादर करणे आणि प्रसिद्ध करणे.
५. समाजातील शिक्षणात मागासलेल्या घटकांवर लक्ष केन्द्रित करून तेथे शैक्षणिक प्रगति करण्यासाठी शाळा, महाविद्यालये व वसतीगृहे चालविणे अगर ती चालविण्यास प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण निधीची व्यवस्था करणे व त्याद्वारे त्यांच्या शिक्षणासाठी परतफेडीच्या तत्वावर शिष्यवृत्या किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
६. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी, शैक्षणिक कालावधी दरम्यान रहाणे आणि भोजन तसेच शैक्षणिक सामग्री तसेच गणवेश अशा प्रकारची आवश्यकतेनुसारची मदत करणे.
७. समाजात सामाजिक, राष्ट्रीय व धार्मिक सण-उत्सव साजरे करून त्याद्वारे समाजात एकोपा निर्माण करून समाजाची वैचारिक, सांस्कृतिक आणि बौध्दिक पातळी वाढविणे आणि त्याकरिता योग्य प्रकारची वार्षिक कार्यक्रम पत्रिका आखणे व त्या कार्यक्रम पत्रिकेला कार्यान्वित करणे.
८. समाजातील क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य निर्मिती, कला क्षेत्राची आवड असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी समाजाच्या गरजू व होतकरू व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी आवश्यक त्या निधीची व्यवस्था करणे, तसेच गरज भासल्यास त्यासाठी परतफेडीच्या तत्वावर शिष्यवृत्या किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
९. समाजातील तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे चालविणे, व्यवसायाभिमुखी विविध उद्योगांचे प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारांच्या संधी विषयी माहिती देणे, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच ह्या विषयक शासनाच्या उपक्रमांची माहिती देण्याची व्यवस्था करणे.
१०. समाजातील बालकांच्या / विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी / उन्नतीसाठी अभ्यासवर्ग, लहान मुलांसाठी बालवाडी, वाचनालय, महिलांसाठी महिला मंडळ स्थापन करून शिक्षण, हस्तकला, रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.
११. समाजातील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे, मार्गदर्शन वर्ग चालविणे, प्रशिक्षण व सल्ला केंद्रे चालविणे.
१२. समाजातील उच्च शिक्षणासाठी अन्य राज्यात अथवा परदेशात जाऊ इच्छिणार्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी हातभार लावणे.
१३. समाजातील अनाथ – अपंगांच्या तसेच निराधार कुटुंबियांच्या सहाय्यार्थ योजना आखणे व त्यांना आर्थिक मदत करणे, आणि त्यासाठी शासकीय तसेच निम-शासकीय आणि बिन-शासकीय संस्था, अथवा मंडळांकडून आर्थिक तसेच अन्य सर्व प्रकारचे सहकार्य व सहाय्य मिळविणे.
१४. समाजातील दिव्याअंग व्यक्तींच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना आखणे, दुर्धर आजाराने तसेच कोणत्याही प्रकारच्या गंभीर अपघाताने पीडित व्यक्तींना औषधोपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणे, समाजातील गरजवंत व्यक्तींसाठी विविध प्रकारची वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे.
१५. समाजातील नैसर्गिक आपत्तीत म्हणजे वादळ, पूर, भूस्खलन, वीज पडणे, आग लागणे, आणि मनुष्यनिर्मित आपत्ती म्हणजे अपघात, दंगल, अशा कोणत्याही प्रकारच्या आपदामध्ये सापडलेल्यां समाजातील व्यक्तींना आपत्कालिन सहाय्यता तसेच औषधोपचार यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची तजवीज करणे. तसेच गरज भासल्यास आवश्यकतेनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे.
१६. समाजाच्या उद्देश्यांशी निगडीत असलेल्या शासकीय तसेच निम-शासकीय आणि बिन-शासकीय संस्था, अथवा मंडळांशी आर्थिक तसेच अन्य सर्व प्रकारचे सहकार्य व सहाय्य मिळविणे.
१७. संस्थेच्या उद्देश पूर्ततेसाठी सर्व आर्थिक, सामाजिक, लिखाणाचे तसेच कायदेशीर व्यवहार करणे.
१८. वर न उल्लेख केलेली परंतु जी योग्य व वैध अशी कार्ये आहेत, ती शक्य झाल्यास कार्यकारणीच्या संमतीने पूर्ण करणे.